मंडाले
मंडाले : ब्रह्मदेशातील याच नावाच्या विभागाचे व जिल्ह्याचे मुख्य ठिकाण, लोकसंख्या ४,१७,२६६ (१९७३). हे रंगूनच्या उत्तरेला सु. ५६४ किमी. इरावती नदीकाठी वसलेले असून देशातील एक प्रमुख धार्मिक व सांस्कृतिक केंद्र म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना येथेच कारावासात ठेवण्यात आले होते. हे देशाच्या मध्यवर्ती भागात वसलेले असल्याने रस्ते, लोहमार्ग, वायुमार्ग व इरावती नदीद्वारे जलवाहतूक यांमुळे एक प्रमुख व्यापारी दळणवळण केंद्र म्हणून विकास पावलेले आहे.